मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात लॉकडाऊनची घोषणा करू शकतात. महाराष्ट्रातील लॉकडाऊन संदर्भात मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता आहे. तसेच लॉकडाऊन घोषित केल्यानंतर त्याची अंमलबजावणी दोन दिवसानंतर करण्यात येऊ शकते, असं मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लगेच त्याची अंमलबजावणी होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
‘महाराष्ट्रातील गरीबाची चूल पेटली पाहिजे, हा जरी महत्त्वाचा विषय असला तरी लॉकडाऊन शिवाय महाराष्ट्रात पर्याय नाही,’ असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. तसेच नागरिकांना निर्णय झाल्यानंतर दोन दिवसाची मुभा देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. महाराष्ट्रातील लॉकडाऊनच्या काळात कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणाच्याही संपर्कात आपण येणार नाहीत, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असं आवाहन यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.






