१२ वी नापास डॉक्टर बनून चालवत होता मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून बनावट डॉक्टर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवत असल्याचं उघडकीस आलं आहे. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला. कारण बनावट डॉक्टरने फक्त बनावट डॉक्टरची डिग्री नाही तर स्वतःची ओळखही बनावट बनवून घेतली होती. शिरूर तालुक्याच्या कारेगाव येथे 2019 पासून श्री मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या हॉस्पिटलमध्ये 22 कोरोना रुग्णही भरती करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णालयाचे डॉक्टर हे बारावी नापास असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ माजली आहे.

महमूद फारुक शेख या मूळच्या नांदेडच्या असलेल्या व्यक्तीने महेश पाटील नावाने बोगस कागदपत्र तयार केली आणि खोटी डॉक्टरची डिग्री ही बनवून घेतली. तसेच मूळचे नंदुरबारचे असलेले डॉक्टर शीतलकुमार पाडवी यांना भागीदारीत रुग्णालय सुरू करू असं सांगून बजाज फायनान्सकडून हॉस्पिटलसाठी कर्ज मंजूर करून घेतलं. शिरूरच्या कारेगाव येथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करू असं आरोपीने आपल्या भागीदाराला सांगितलं. महेश पाटील नावाच्या आरोपीने ओस्तवाल या मालकाची जागा भाड्याने करार करून घेतली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर शीतल कुमार यांच्याकडे हॉस्पिटलच्या कामासाठी पैसे देण्याच्या तगादा लावला. शीतलकुमार यांनी 10 लाख रुपये रोख आणि चेकद्वारे 5 लाख 50 हजार रुपये आणि जागा मालकाच्या नावे 2 लाख रुपये असे एकूण 17 लाख 50 हजार रुपये महेश पाटील यांना दिले.

डॉक्टर शीतल कुमार यांचे संपूर्ण पैसे वापरून मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्यात आलं. महेश पाटील यांच्या कर्जाकरिता रजिस्ट्रेशनची कागदपत्र हजर करण्यास सांगितलं. परंतु महेश पाटील हा कागदपत्र देण्यास टाळाटाळ करत होता. 11 एप्रिल 2019 ला हे रुग्णालय सुरू करण्यात आलं. परंतु ज्या डॉक्टर शीतलकुमार यांचे पैसे लावून हे हॉस्पिटल बनवण्यात आलं त्यांना याची कल्पनाही नव्हती. शीतलकुमार यांनी विचारणा केली असता मला तुमची पार्टनरशिप नको, मी तुमचे पैसे परत देतो. तुम्ही हॉस्पिटलमधून बाजूला व्हा. असं आरोपीने त्यांना सांगितलं. डॉक्टर शीतल कुमार यांची फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं पण पैसे परत मिळत असल्याने त्यांनी तक्रार केली नाही. तसेच 2019 नंतर नंदुरबार जिल्ह्यातील गताडी प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतलकुमार यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करायला सुरुवात केली.

वेळोवेळी पैशांची मागणी करूनही महेश पाटील नामक व्यक्ती पैसे देत नसल्याने अखेर डॉक्टर शीतलकुमार यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली त्यानंतर शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे सुरू असलेल्या मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा बनावट कारभार उघडकीस आला. तसेच सदरील आरोपीचं नाव महेश पाटील नसून मेहमूद फारुक शेख असल्याचं स्पष्ट झालं असून तो बारावी नापास असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here