मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक दिवसेंदिवस पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोणत्याही क्षणी महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषित करू शकतात. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी मोठं वक्तव्य केलंं आहे.
‘महाराष्ट्रात उद्या लॉकडाऊन घोषित होण्याची शक्यता आहे. त्याबाबत मुख्यमंत्री आजच निर्णय घेतील. एवढंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली आजच तयार होईल’ असं वक्तव्य मुंबईचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लॉकडाऊन जवळपास निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. पण हा लॉकडाऊन नेमका किती दिवसांचा असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, गेल्या आठवड्याभरापासून बैठकांचे सत्र सुरू आहे. तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही विश्वासात घेण्याचे काम करण्यात येत आहे. याबरोबरच टास्क फोर्सच्या सदस्यांशी चर्चा केली, त्यांची मतेही जाणून घेतली. तसेच सामान्य नागरिकांचीही मतं जाणून घेतली. त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत आज निर्णय होईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना साखळी तोडण्यासाठी लाॅकडाऊन करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याबाबत आज नियमावलीही जाहीर होईल. याबरोबरच परप्रांतीय लोकांना आपण परत गावी जाण्यासाठी अडवत नसल्याचंही अस्लम शेख यांनी यावेळी बोलताना सांगितलं.






