पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – शहरातील लॉ कॉलेज रस्त्यावर भर दुपारी प्राध्यापक तरूणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संबंधिताने मानसीक तणावातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.
किरण राजकुमार (वय ३२ रा. केरळ) हा मुळचा केरळचा रहिवासी असून तो पुण्यात एका आर्किटेक्चर कॉलेजमध्ये प्राध्यपकाची नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला नोकरी गमवावी लागली होती.दरम्यान, किरण गुरूवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमरास लॉ कॉलेज रस्त्यावरील जर्मन बेकरीजवळ असलेल्या महावितरणच्या फिडरपिलर जवळ गेला. त्यानी अचानक फिडरपिलरचा दरवाजा उघडकून विद्युत प्रवाहित वायरी हातात घेतल्या. वायरी हातात घेताच त्याना विजेचा धक्का बसल्याने ते लांब फेकले गेले. नागरिकांनी याची खबर डेक्कन पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संदीप जाधव आणि त्यांचे सहकारी तत्काळ घटनास्थळी गेले.
याबाबत प्रत्यक्षदर्शीना विचारणा केली असता, त्यांनी किरणने फिडरपिलरचा दरवाजा उघडून वायरी हातात घेतल्यानंतर त्याला विजेचा धक्का लागून तो लांब फेकला गेल्याचे सांगितले. त्याला तत्काळ ससून रूग्णालयात नेले असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विजेच्या धक्क्याने त्याच्या हाताला जखम झाली होती. तरूणाच्या खिशातील ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली. त्यानंतर त्याच्या वडीलांना त्याच्या मृत्यूबाबत माहिती देण्यात आली. डेक्कन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक जाधव करत आहेत.
दरम्यान, घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, फिडरपिलरचा दरवाजा व्यवस्थित बंद करण्यात आला होता. फिडरपिलरही सुस्थितीत आहे. मात्र हा प्रकार कसा घडला. याची चौकशी विद्युत निरिक्षक खात्याकडून करण्यात येत आहे. त्याबाबतची माहिती खात्याला कळविण्यात आल्याचे महावितरणच्या अधिकार्यांनी सांगितले.






