- सचिन-कपिल देव यांचाही सन्मान
नवी दिल्ली – सातत्यपूर्ण कामगिरी करत वाहवा मिळवणाऱ्या टीम इंडियाचा विराट कोहलीच्या शिरपेचात गुरुवारी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. विराट कोहली याची विस्डन अलमॅनाककडून गेल्या दशकातील सर्वोत्तम एक दिवसीय खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंच्या पुरस्कारांची घोषणा केली होती. यातही दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार विराट कोहली याला जाहीर झाला होता.
विराट कोहली याने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. श्रीलंकेविरुद्ध तो आपला पहिला एक दिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर गेल्या दशकभरात तो टीम इंडियाचा ‘रनमशीन’ म्हणून उदयाला आला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2011 ला विश्वचषक जिंकला त्या संघाचा विराट सदस्य होता. गेल्या दशकभरात त्याने 11 हजारांहून अधिक धावा आणि 42 शतक ठोकले आहेत. तसेच एकूण कारकीर्दीमध्ये त्याच्या नावावर 254 लढतीत 12,169 धावांची नोंद असून यात 43 शतकांचा आणि 62 अर्धशतकांचा समावेश आहे.
दरम्यान, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याची सलग दुसऱ्या वर्षी ‘वर्षातील सर्वोत्कृष्ठ खेळाडू’ (Best Player of the Year) म्हणून निवड करण्यात आली. स्टोक्सने गेल्या वर्षी 641 धावा आणि 19 बळी घेतले. स्टोक्ससह वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरोन पोलार्ड याला सर्वोत्तम टी-20 खेळाडू तर ऑस्ट्रेलियाच्या बेथ मूनीला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले.
विराट कोहली याच्यासह सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचाही सन्मान करण्यात आला आहे. सचिनची नव्वदच्या दशकातील, तर कपिल देव यांची ऐंशीच्या दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड झाली. नव्वदच्या दशकात सचिन सर्वोत्तम फॉर्मात होता. 1998 ला त्याने एक दिवसीय क्रिकेटमध्ये 9 शतकांचा विक्रम केला होता. तर ऐंशीच्या दशकात कपिल देव यांनी टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला होता. तसेच सर्वाधिक बळी घेत सर्वोत्तम स्ट्राईक रेटने एक हजार धावा चोपण्याचाही विक्रम केला होता.






