नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – ट्रकचालक व दोन वाहक २४ लाखांची तूर डाळ घेऊन पसार झाले. याप्रकरणी कळमना पोलिसांनी चालक रामरतन (वय ३०, रा. कटरा, उत्तर प्रदेश), वाहक राहुल (वय २८) व राजकुमार (वय ३५) या तिघांविरुद्ध विश्वासघाताचा गुन्हा दाखल केला.
सौरभ चंद्रकुमार गुप्ता (वय ४० रा. देशपांडे ले-आऊट) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्ता यांची डिप्टी सिग्नल भागात सौरभ डाळ मिल आहे. ८ एप्रिलला सौरभ यांनी रामरतन याच्या यूपी-७०-ईटी-०००३ या क्रमांकाच्या ट्रकमध्ये २५ टन तूर डाळ भरली. ही तूरडाळ प्रतापगढमधील बजरंग एजन्सी येथे पोहोचवायची होती.
डाळ घेऊन रामरतन व वाहक नागपुरातून निघाले. मात्र, ते बरजंग एजन्सी येथे पोहोचले नाहीत. मध्येच डाळ घेऊन पसार झाले. गुप्ता यांनी कळमना पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांचा शोध सुरू केला आहे.






