नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – ‘मी जीवनाला कंटाळलो आहे. पत्नी व मुलांनो मला माफ करा’, अशा आशयची चिठ्ठी लिहून शिक्षकाने आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना ऑरेंजनगरमधील शिवनारायण अपार्टमेंट येथे बुधवारी सायंकाळी घडली.
महेंद्र मधुकर वैरागडे (वय ४८) असे मृतकाचे नाव आहे. ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र यांच्या पत्नी अश्विनी या उमरेडमधील शाळेत शिक्षका आहेत. त्यांना मुलगा व मुलगी आहे. बुधवारी महेंद्र यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच वाठोडा पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक एस. एम. मुंडे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी महेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली. ‘जीवनाला कंटाळलो आहे. मला माफ करा’, असे चिठ्ठीत लिहिले आहे. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.






