होम आयसोलेट असलेले रुग्णच बनत आहेत कोरोनाचे सुपर स्प्रेडर

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – राज्यातच नाही तर देशात सध्या कोरोनाही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यातच कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढतच आहे. हा आकडा वेगाने वाढण्याचे सर्वात मोठे कारण समोर आले आहे ते म्हणजे जे होम आयसोलेट असलेले रुग्ण. पॉझिटिव्ह आल्यानंतर किमान 14 दिवस कोणाच्याही संपर्कात रुग्ण यायला नको. असे असतानाही सध्या पॉझिटिव्ह रुग्ण बिनधास्त बाहेर फिरत असल्याने तेच कोरोनाचे सुपर स्प्रेडर ठरत असल्याची माहिती समोर येत आहे.

मागच्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरु झाला यात पहिल्यांदा रुग्ण आढळल्यानंतर थेट रुग्णवाहिकेतून त्याला रुग्णालयात घेऊन जाण्यात येत होते. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढली आणि यात लक्षण असलेले आणि लक्षण नसलेले अशी वर्गवारी करण्यात आली. त्यातही रुग्णालय फुल्ल झाल्यानंतर होम आयसोलेशनचा पर्याय समोर आला. मात्र यासाठी अनेक नियम घालून देण्यात आले होते. परंतु या नियमांचे दुसऱ्या टप्प्यात मात्र पालन होत नाही. त्यामुळे वसाहतीत आणि सार्वजनिक ठिकाणी वावरणारे होम आयसोलेटेड रुग्ण ओळखणे अवघड झाले असून त्यांच्या माध्यमातुनच कोरोनाचा संसर्ग अधिक वाढत आहे.

त्यातच मागील काही दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण वाढले आहे. या मुलांना लक्षणे तर दिसत नाहीत परंतु ते पॉसिटिव्ह आढळतात. विशेष म्हणजे घरातील एखादी व्यक्ती बाधित झाल्यानंतर मुलांची तपासणी केल्यास ही बाब समोर येते. या मुलांच्या माध्यमातूनही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होम आयसोलेटेड रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्ण घरीच राहून उपचार घेत आहेत. उपचार सुरु असताना मला काहीच दुखणं नाही असे म्हणत हेच रुग्ण अनेक वेळा बाहेर पडून बाजारात विविध वस्तूंची खरेदी करत आहेत. त्यात मग किराणा, भाजी, फळ असो आणि इतर बाबी. रोज बाजारात शासनाने निर्धारित केलेल्या वेळेच्या आधी मोठी गर्दी होत आहे आणि तिथूनच हा संसर्ग अनेक जण आपल्या घरापर्यंत घेऊन जात आहेत. यावर प्रशासनाने किमान या रुग्णांना होम आयसोलेट असल्याचा शिक्का हातावर मारणे अथवा इतर पर्याय शोधून या रुग्णांचे बाहेर पडणे थांबवणे आज गरजेचे बनले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here