नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्ह्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने वाढत असुन सक्रिय रूग्ण संख्या नऊ हजार च्या वर पोहोचली आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कोवीड केअर सेंटरची आवश्यकता भासत आहे जिल्हा प्रशासनाकडून विलगीकरण कक्षाची कमतरता भासत असल्या कारणाने भविष्यातील वाढत्या रूग्णांचा धोका लक्षात घेता खा. डॉ. हिना गावित यांनी केंद्र सरकारकडे रेल्वे कोवीड केअर सेंटर ची मागणी केली होती
त्या अनुषंगाने नंदुरबार येथे अद्यावत रेल्वे कोवीड केअर ट्रेन नंदुरबार रेल्वे स्थानकावर येऊन धडकली आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सांभाळताना प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे चित्र सध्या दिसत आहे जिल्ह्यात रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असुन आरोग्य यंत्रणेकडे 1500 बेडची क्षमता असली तरी ती अपूर्ण पडत आहे म्हणूनच खा. डॉ.हिना गावित यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाची मदत घेतली आहे .
भारत सरकारने सदर मागणी मान्य करीत 31डब्याची ट्रेन रुग्णाच्या आयसोलेशनसाठी पाठवली आहे. जवळपास 600 रूग्णांची व्यवस्था 22 डॉक्टराच्या मदतीने करण्यात येणार आहे. तसेच गंभीर रुग्णांसाठी प्रत्येक कोच मध्ये दोन ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात आली आहे. या रेल्वे कोवीड सेंटर मुळे आरोग्य यंत्रणेवरचा बराचसा ताण कमी होणार आहे तसेच खा. हिना गावित यांच्या प्रयत्नांना आलेल्या यशामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.आज दुपारी 3 वाजता हे कोवीड सेंटर जनतेच्या सेवेसाठी प्लॅट फार्म नं 3 वर खुले करण्यात येणार आहे.






