सांगली (प्रतिनिधी शरद मोरे) – मामाच्या मुलीशी असणारे संबंध तोडले नाहीत, म्हणून 19 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील दरीबडची गावात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत.
जत तालुक्यातील दरीबडची गावात गुरुवारी रात्री साडे आठ ते दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या हत्येमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. जत पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच रातोरात दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. धनाजी भागप्पा टेंगले असं 19 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.
धनाची टेंगले याचे आरोपी राजू लेंगरे याच्या मामाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही बाब राजूला माहिती होती. परंतु राजूचे संबंधित तरुणीसोबत लग्न करण्याची चर्चा घरातील नातेवाईकांमध्ये सुरू होती. यातूनच राजू आणि धनाजी यांच्यात धुसफूस सुरु झाली. राजू लेंगरेने धनाजीला आपल्या मामाच्या मुलीचा नाद सोड, म्हणून तगादा लावला होता, तरीही दोघांमधील प्रेमसंबंध कायम असल्याचा संशय आरोपी राजूला होता.
धनाजी टेंगळे गुरुवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे दूध वितरित करण्यासाठी दरीबडची गावात आला होता. दूध वाटून तो दररोज आठपर्यंत घरी येत असे. परंतु रात्री दहा-साडेदहा वाजले तरी तो घरी परतला नाही, म्हणून घरातील वडील आणि नातेवाईकांनी शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना दरीबडची कुलाळवाडी रस्त्यावर धनाजीचा मृतदेह आढळून आला.
धनाजीच्या डोक्यात आणि तोंडावर दगडाने गंभीर वार करण्यात आले होते. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी दुधाची किटली आणि चप्पलही तिथेच पडले होते. धनाजीवर पाळत ठेवून पद्धतशीरपणे खून करण्यात आला. जत पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.






