मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतु संचारबंदी असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत आहेत. प्रशासनाकडून वेळोवेळी रस्त्यावर गर्दी करू नका असं आवाहन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे गर्दी आटोक्यात आणण्यात पोलिसांचे देखील हाल होत आहेत. यावरच आता मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी लोकांना आवाहन केलं आहे.
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर पोलिसांना शक्य तेवढी सगळी मदत करण्याचं आवाहन देखील त्यांनी जनतेला केलं आहे. चहा, पाणी किंवा शक्य असल्यास जेवणही त्यांना द्या. त्यांच्याकडे नाही असं नाही, पण आपली आपुलकी समोर येईल, असंही हेमंत नगराळे म्हणाले.
कोरोना यंदा भयंकर आहे. जे दिलेल्या सूचना पाळत नाही, उगाच बाहेर येत आहेत ते योग्य नाही. 15 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवा सुरू आहे. मागच्या वेळीपेक्षा हा लॉकडाऊन थोडा वेगळा आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून वागावं. रस्त्यावर कोणी यावे कोणी नाही याबाबत सूचना दिली गेली आहे. पोलीस सर्व घटनांवर लक्ष ठेवून आहेत. पोलीस आपली जबाबदारी पूर्ण करत आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, कोरोनाच्या पहिल्या लाटेत मागील वेळी 8000 पोलीस संक्रमित होते, तर यावेळी 541 पोलीस कर्मचारी संक्रमित आहेत. मुंबई पोलीस मधील आतापर्यंत एकूण 102 पोलीस मृत्युमुखी पडलेत.






