निगेटिव्ह रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह दिल्याचा आरोप करत डॉक्टरला चपलेने मारहाण

गोंदिया – महाराष्ट्रात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. अशात विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान डॉक्टरांना मारहाण करण्याचे किंवा कोविड सेंटरची तोडफोड केल्याची काही प्रकरणं समोर येत आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात गुरुवारी एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या लोकांच्या मते, डॉक्टराने पैसे उकळण्याच्या हव्यासापोटी कोरोना निगेटीव्ह रुग्णाला पॉझिटिव्ह असल्याचं सांगत रुग्णालयात दाखल करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टराला चांगलीच मारहाण केली आहे. संबंधित घटना गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यातील आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर डुग्गीपार पोलिसांनी संबंधित रुग्णावर आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पण या मारहाण प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून संतापलेले नातेवाईक डॉक्टराला चपलीने मारहाण करताना दिसत आहेत. त्याचबरोबर नातेवाईक अर्वाच्च भाषेत शिवीगाळही करत आहेत. या व्हिडीओच्या अधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here