कडक निर्बंध १ मेच्या पुढेही वाढवले जाऊ शकतात – राजेश टोपे

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महाराष्ट्रात लागू करण्यात आलेेले ब्रेेक दि चेन निर्बंध 1 मेच्या पुढेदेखील वाढवले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जालना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, गेल्या 15 एप्रिलपासून महाराष्ट्रात कडक निर्बंध आणि संचारबंदी लागू केली आहे. 1 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत हे निर्बंध कायम राहतील. महाराष्ट्रातील जनतेने या निर्बंधांना पूर्ण पाठिंबा दिला आहे हे मान्यच केले पाहिजे. आता या पंधरा दिवसांतील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच हे निर्बंध पुढे सुरू ठेवायचे की उठवायचे याचा निर्णय घेतला जाईल.

महाराष्ट्रात वाढती रुग्णसंख्या पाहता आणखी ऑक्सिजन लागेल. त्यामुळे गरज पडल्यास छत्तीसगड, तामिळनाडू, मध्य प्रदेश आदी राज्यांतून रेल्वे वॅगनद्वारे ऑक्सिजन आणला जाईल. महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा अडवला जाऊ नये, यासाठी केंद्रीय गृहसचिवांनी पत्र दिले आहे, अशी माहितीही टोपे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here