नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतले असून त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली आहे. तसेच या बेजबाबदार नागरिकांकडून दंडही वसूल करण्यात येणार आहे.
राज्यात कडक संचारबंदीचे आदेश राज्य शासनाकडून देण्यात आले असून त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे यासाठी पोलीस प्रशासनाने रविवारी सुट्टीचा फायदा घेऊन विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या २० नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची आरोग्य विभागाकडून एंटीजन टेस्ट करण्यात आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापना कडून विकेंड लॉक डाऊन म्हणून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत .या काळात वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद असतील असे जाहीर केले असतांना बरेचसे भाजीपाला व फळ विक्रेते रस्त्यावर विक्री करताना दिसून आल्याने तसेच काही दुकानेदेखील सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांना लक्षात आल्यावर त्यांनी त्वरित कारवाई करत संबंधितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचे अस्त्र उगारले आहे.
जिल्ह्यात प्रथमच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात अशी दंडात्मक कारवाई व एंटीजन टेस्टची शक्कल लढवून कारवाई केल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाची जरब बसेल व कोरोना संसर्गाची साखळी खंडित करण्यास प्रशासनाला मदत होईल. ताब्यात घेतलेल्या नागरिकांमध्ये १८ पुरुष व २ महिला असून त्यांची रॅपिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तरीही गरज असेल तरच घराबाहेर पडा , प्रशासनाला सहकार्य करा,नाही तर कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी यावेळी बोलतांना दिला आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या कारवाईचे शहरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.






