जयपूर (राजस्थान) – कोरोनासारख्या संकटाच्या काळात धार्मिक गोष्टींपेक्षा माणुसकीचा धर्म जास्त महत्त्वाचा आहे, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे. राजस्थानच्या उदयपूर येथे अकील मन्सुरी या तरुणाने रोजाचा उपवास सोडून प्लाझ्मा दान केले. त्यामुळे दोन महिलांचा जीव वाचला.
अकिल मन्सुरी या तरुणाने आतापर्यंत 17 वेळा प्लाझ्मा दान केले आहे. मात्र, यावेळी त्याच्या प्लाझ्मामुळे दोन महिलांचे जीव वाचले. त्यामुळे उदयपूरमध्ये अकिलचे कौतुक करण्यात येत आहे.अकील मन्सुरी हा 32 वर्षांचा तरुण उदयपूरच्या देबारी परिसरातील रहिवासी आहे. तो बांधकाम क्षेत्रात कामाला आहे. आजपर्यंत अकीलने समाजसेवेची अनेक कामं केली आहेत. मध्यंतरी त्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामधून तो बराही झाला. मात्र, या सगळ्याकडे तो सकारात्मकपणे पाहतो. कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या लोकांना प्लाझ्मा दान करता यावा, यासाठीच आपल्याला कोरोना झाला असावा, अशी त्याची धारणा आहे. त्यामुळे उदयपूरमध्ये ज्याठिकाणी कोरोना रुग्णांना प्लाझ्माची गरज असते त्याठिकाणी अकील मन्सुरी धावून जातो.
सध्या मुस्लिम बांधवांसाठी पवित्र समजला जाणार रमजानचा महिना सुरु आहे. या काळात अनेकजण उपवास करतात. अकीलही रोजाचा उपवास धरत होता. मात्र, दोन महिलांना प्लाझ्माची गरज आहे असे समजल्यानंतर तो रुग्णालयात गेला. प्लाझ्मा दान करण्यापूर्वी त्याला तुम्ही काही खाल्ले आहे का, असे विचारण्यात आले. मात्र, रोजा असल्यामुळे अकीलने काहीही खाल्ले नव्हते.
मात्र, प्लाझ्मा डोनेशनसाठी काहीतरी खाणे गरजेचे आहे समजल्यानंतर अकीलने कोणताही न विचार करता आपला उपवास सोडला. अकीलने दान केलेल्या प्लाझ्मामुळे निर्मला आणि अलका या दोघींचे प्राण वाचले. कोरोनामुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. मात्र, अकीलने वेळीच प्लाझ्मा दिल्यामुळे या दोघींचा जीव बचावला.






