पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १० दिवसांपासून त्या आयसीयूमध्ये होत्या. आज त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. याशिवाय नितळ, अस्तु देवराई यासारखे अनेक आशयघन चित्रपट त्यानं दिग्दर्शित केले आहेत.
सुमित्रा भावे यांनी दिग्दर्शक सुनील सुकथनकर यांच्यासह अनेक उत्तमोत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती केली. ‘बाई’, ‘पाणी’ या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये ‘दोघी’ हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘दहावी फ’, ‘वास्तुपुरुष’, ‘देवराई’, ‘बाधा’, ‘नितळ’, ‘एक कप च्या’, संहिता, ‘घो मला असला हवा’, ‘कासव’, ‘अस्तु’ हे चित्रपट गाजले. ‘दिठी’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्यांचे चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत नावाजले गेले; तर अनेक चित्रपटांना राज्य व राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. ‘विचित्र निर्मिती’ या बॅनरखाली तयार झालेल्या, विविध सामाजिक प्रश्न हाताळणाऱ्या त्यांच्या चित्रपटांचा चाहतावर्ग मोठा आहे. सोनाली कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, सचिन तेंडुलकर अशा अनेक कलाकारांना सुमित्रा भावे यांच्याकडे सिनेमाचे धडे गिरवता आले.
भावे यांचा जन्म १२ जानेवारी १९४३ मध्ये पुण्यात झाला. फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळविल्यानंतर मुंबईतील टाटा समाजविज्ञान संस्थेतून त्यांनी ग्रामीण विकास या विषयात पदविका मिळविली. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले. पूर्ण वेळ समाजशास्त्रज्ञ म्हणून काम करायचे ठरविल्यानंतर सुमित्रा भावे अपघातानेच लघुपटाकडे वळल्या. मात्र, या माध्यमाची ताकद लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ चित्रपट निर्मितीत उतरण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या.






