सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) – बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन बाईक खाली कोसळून दुचाकीस्वारांना प्राण गमवावे लागले, तर एक जण जखमी झाला आहे. सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात हा भीषण अपघात झाला. अपघातग्रस्त तरुण हे कोल्हापूर जिल्ह्याचे रहिवासी असल्याची माहिती आहे. बाईकस्वार बांधकाम सुरु असलेल्या पुलावरुन रात्री ट्रिपल सीट जात असल्याची माहिती आहे.
कराड-मलकापूर रोडवरील पुलाचे बांधकाम सुरु असल्याने या रोडवरील वाहतूक बंद आहे. तरीही या पुलावरुन संबंधित बाईकस्वार रात्रीच्या वेळेस ट्रिपल सीट प्रवास करत होते. त्यातच अपघात होऊन बाईक थेट उड्डाणपुलावरुन खाली कोसळली. सातारा जिल्ह्यात कराड चांदोली रोडवर उंडाळे जवळ ही अपघाताची घटना घडली. अंधारामुळे रस्ता न दिसल्याने अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मृत आणि जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील भेंडवडी येथील रहिवासी होते. अपघातात जानु भैरु झोरे आणि कोंडिबा भागोजी पाटने यांना प्राण गमवावे लागले. तर जखमी दगडू बिरू झोरे यांच्यावर कराडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कराड पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.






