मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. मागील काही काळापासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे राज्यासाठी रेल्वेवाहतुकीमार्गे जलदगतीने ऑक्सिजनची वाहतूक व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र शासनाकडे केली होती. यावर केंद्र सरकारने सकारात्मक प्रतिसाद देऊन रेल्वेवाहतुकीला परवानगी दिली आहे.
राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी 7 मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ आज रवाना करण्यात आली. रेल्वेने प्रतिसाद देताच राज्याने जलदगतीने हालचाली करुन आज पहिली रेल्वे रवाना केली. परिवहनमंत्री अनिल परब यांनी या एक्स्प्रेसला हिरवा दिवा दाखवला.
प्रत्यक्ष रिकामे टँकर सपाट वॅगनवर ‘रोल ऑन-रोल ऑफ’ पद्धतीने चढवून सोमवारी ऑक्सिजन एक्स्प्रेसला रवानाही करण्यात आलं. या एक्स्प्रेसच्या माध्यमातून येत्या पाच दिवसात 110 मेट्रिक टन द्रवरुप ऑक्सिजनचा पुरवठा रेल्वेवाहतुकीच्या माध्यमातून राज्याला मिळणार आहे. या एक्स्प्रेसला सिग्नल्सचा कमीत कमी अडथळा येईल अशा पद्धतीने ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला असून केवळ दीड दिवसात ती विशाखापट्टणम येथे पोहोचेल.
दरम्यान, एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेने मंजूरी दिली. त्यामुळे यापुढील काळात प्राणवायूच्या निरंतर पुरवठ्यासाठी रेल्वेच्या मदतीने आणखीन ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे ऑक्सिजन तुटवड्यावर मात करणं शक्य होणार आहे.






