शब्दांकन – पुणे (बाजीराव नाईक)
बाजीराव सदाशिव नाईक
गावगाड्यातल्या सणांचा थाट काय येगळाच असायचा.श्रावण महिना सुरु झाला की सणांना सुरुवात व्हायची.गावगाड्यात आनंदाला उधान यायच.सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र यायचे.
श्रावण सुरुवात होताच घरोघरी ग्रंथ वाचन सुरु व्हायचे.आजही होत पण प्रमाण खुप कमी झाल.आमचे आण्णा -सगळ्या गावाचे पांडू बुवा-माळकरी-आण्णांच्या संग्रही रामायण -महाभारत-दासबोध-शिवलीला अमृत-दासबोध अशी किती तरी ग्रंथ संपदा होती.आज जरी आमचे आण्णा हयात नसले तरी त्यांची ग्रंथ संपदा जपून ठेवली आहे.
श्रावण आरंभ होताच आमच्या घरी ग्रंथ वाचनास सुरुवात व्हायचे आमचे मोठे चुलते -थोरले बाबा कोणतेही शिक्षण नसताना सुद्धा तालासुरात ग्रंथ वाचन करायचे-आमचे बापू अर्थ सांगायचे.मध्येच बोला पुंडलीक वरदे…चा जय घोष व्हायचा.आम्ही पोर पेंगत ऐकायचो,रामायण -महाभारतातील,लढाईचा प्रसंग तेवढा मन लाऊन ऐकायचो.ग्रंथ समाप्तीला पूजा व्हायची,सगळ गाव जमायच,सोंगी भजन-किर्तन व्हायचा.गावात आणखी ४-५ ठिकाणी ग्रंथ वाचन व्हायचे.
सगळा गावगाडा भक्ती रसात न्हाऊन निघायचा.बेंदरा नंतर,सण यायचा तो म्हणजे नागपंचमीचा.नाग पुजेचा सण.घरोघरी मातीच्या नागांची पूजा व्हायची,कुंभार वाड्यातून हे मातीचे नाग घरोघरी वाटले जायचे.उकडीच्या कानावल्याचा नैवद्य दाखवला जायचा.जोतीबाच्या देवळा समोर मुली झिम्मा फुगडीचा ठेका धरायच्या.नागोबाला पूजुया …दूध लाह्या वाटूया……माझ्या नागराजा गीते घुमायची.गावात आनंदाला भरती यायची.
नागपंचमी सण आम्हां पोरांना पर्वनीच असायच.दोन दिवस आदीच आमचे आण्णा किंवा नाम दादा मेपट–कटक उडावायचे साधन काढूण द्यायचे..त्याला सळीचा कणा घालायचो.साताळ डाग,घुबड्याची डाग हिंडुण कार गोळा करायचो.धनगर वाड्याहून पाटी भरुण कटक विकाय लोक यायचे.धान्याच्या बदलात कटक द्यायची.कटकाने आमचे खिसे भरायचे….मेपट्यात कटक-कार भरुन एकमेकांच्या अंगावर उडवायचो.कटकांचा कपड्यावर,पडलेला डाग निघायचा न्हाय.
कटक-कार मेपट्यातून बाहेर,पडाल की जाळ नी धूरच निघायचा.मेपट्याचा आवाज AK-56 चा आवाज फिका पाडेल असा असायचा.दिवसभर एकमेकांच्या अंगावर,कटक-कार उडवायचो.संध्याकाळी जोतीबाच्या देवळावर मेपट्याचा आवाज घुमायचा.
गावची काही मूल ३२शिराळा नागपंचमी सोहळा बगाय जायची .गावगाड्यातल्या ह्या सणांची मज्जा काय औरच असायची. आज दिवस बदलले,काळ बदलला..कांही ठिकाणी गावगाड्यात आजही असे सण साजरे केले जातात.काळाच्या ओघात मेपट्याचा आवाज मात्र दुर्मिळ झाला.
ओढ लावते अशी जीवाला ..गावाकडंची माती…
(लेखक बहुजन परिवर्तन पार्टी प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती (रजि) चे संस्थापक/अध्यक्ष आहेत)







