कोरोना संकटात बंदोबस्तासाठी गरोदर महिला डीएसपी रस्त्यावर उतरली

नवी दिल्ली – कोरोना संकटात सर्वचजण आपली काळजी घेत आहेत. मात्र, डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनामुळे गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, याच संकटात अशा एक महिला पोलीस अधिकारी आहेत ज्यांच्या कार्याची सध्या सर्वत्र चर्चा होत असून कौतुकही होत आहे. होय, या महिला पोलीस अधिकारी आहेत शिल्पा साहू, ज्या कोरोनाच्या संकटातही रस्त्यावर उतरुन आपले कर्तव्य बजावत आहेत.

छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यात डीएसपी या पदावर शिल्पा साहू कार्यरत आहेत. काही महिन्यांपूर्वी त्या आपल्या लग्नामुळेही चर्चेत आल्या होत्या. लग्नानंतर आपल्या पतीसोबत नक्षल विरोधी अभियानातही त्या सहभागी होत असल्याने त्यांची जोरदार चर्चा होत होती. आता त्या गर्भवती आहेत. मात्र, पाच महिन्यांच्या गर्भवती असतानाही डीएसपी शिल्पा साहू या कोरोना संकटात आणि भर उन्हात आपल्या घरातून बाहेर पडत रस्त्यावर उभं राहून आपले कर्तव्य बजावताना दिसत आहेत.

pregent-dsp-on-duty

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करा आणि विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन डीएसपी शिल्पा साहू या करताना दिसत आहेत. छत्तीसगड नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. गरोदर असतानाही शिल्पा साहू या ना कोरोनाला घाबरत आहेत नाही नक्षलवाद्यांना घाबरत आहेत. त्या आपले कर्तव्य बजावण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत.

डीएसपी शिल्पा साहू या रस्त्यावर उभ्या राहून नागरिकांना आपल्या घरातच राहण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. तसेच मास्कचा वापरही करण्यास सांगत आहेत. कडाक्याचे उन असतानाही त्या रस्त्यावर उभ्या राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कार्याचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियातही प्रचंड व्हायरल होत असून त्यावर युजर्स कौतुकांचा वर्षाव करताना दिसत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here