विरार हॉस्पिटल आग प्रकरण : पतीच्या मृत्यूची बातमी ऐकताच कोरोनाबाधित पत्नीनेही प्राण सोडले

मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. सेंट्रलाईज्ड एसीचा स्फोट होऊन ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या आगीत पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कोरोनाग्रस्त पत्नीचेही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात पहाटे आग लागली. या आगीत ICU मध्ये उपचार घेत असलेल्या 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यात 45 वर्षीय कुमार दोषी यांचाही दुर्देवी मृत्यू झाला. ते वसईतील 100 फूट रोड परिसरात राहत होते. कुमार दोषी यांच्या पत्नी चांदणी दोषी यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर विरारच्या जीवदानी रुग्णालयात उपचार सुरु होते.

त्यावेळी चांदणी यांना पतीच्या निधनाची बातमी मिळताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतीदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये तसेच त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देश दिले आहेत.

आगीची घटना कळल्यानंतर मुख्यमंत्री स्वतः संबंधित अधिकाऱ्यांशी बोलले. त्यांनी सर्वप्रथम प्राधान्याने आग पूर्णपणे विझवणे आणि इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. ही आग कशामुळे लागली याचा योग्य तो तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here