मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ऑक्सिजन टाकी लीक झाल्याने 24 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आज अचानक वसईच्या कोविड हॉस्पिटलमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. विरार पश्चिम याठिकाणी विजय वल्लभ या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला एसीचा स्फोट झाल्याने अचानक आग लागली.
विजय वल्लभ या रुग्णालयात नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी झालेली घटना ही दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे. यावेळी नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
नाना पटोले यांनी बोलताना सांगितलं की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार केंद्र सरकारला आणि पंतप्रधानांना पत्र लिहून कोरोना संदर्भातील उपाययोजना सुचवल्या होत्या तसेच विनंती करण्यात आली होती. पण भाजपतर्फे त्याची थट्टा उडवली गेली त्याला गांभीर्याने घेतल्या गेलं नाही. असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी केला आहे.
याठिकाणी तब्बल 14 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या अतिदक्षता विभागात अचानक रात्री 3 च्या सुमारास लागली. या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवलं असून पोलिसांकडून याठिकाणी मोठ्या प्रमाणात मदतकार्य करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. रुग्णांना इतर ठिकाणी हलविण्यासाठीही युद्धपातळीवर हालचाली करण्यात आल्या. एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. पण या सर्व गोष्टींमुळे प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालं.






