नवी दिल्ली – कोरोनाचे ग्रहण अधिक गडद होत असून, ऑक्सिजन गळतीने नाशिक येथे रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज राजधानी दिल्लीत २० रुग्णांचा जीव गेला आहे. दिल्लीतील जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली असून दोन दिवसांपूर्वी सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये २५ जणांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला होता.
ऑक्सिजनसाठी दिल्लीचे प्राण कंठाशी आल्यासारखी परिस्थिती आहे. सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये २० रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाला आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचे डी. के. बालुजा यांनी सांगितले.
सध्या रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतकाचं ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून सध्या येथे २०० रुग्ण उपचार घेत आहेत. काही तासांत ऑक्सिजन मिळाला नाही तर अनर्थ घडण्याची शक्यता असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.
दिल्लीतील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनाचा तुटवडा भेडसावत असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपत आला होता. येथे ३५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यांना केवळ २५ मिनिटं पुरेल इतकाच ऑक्सिजनसाठा रुग्णालयात शिल्लक होता. रुग्णालयाने दिल्ली सरकारला एसओएस संदेश पाठवल्यानंतर सरकारने तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला ८ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ ५०० लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आला आहे. केवळ १२ तासच पुरेल इतका साठा असल्याचं रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी सांगितले आहे.






