घाबरु नका; येणार तर मोदीच; शेखर गुप्ता आणि अनुपम खेर यांच्यामध्ये ट्‌विटरवर खडाजंगी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता आणि दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांच्यामध्ये ट्‌विटरवर खडाजंगी झाली. कोरोना काळातील गैरव्यवस्थापनाला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप शेखर गुप्ता यांनी केला. त्यावर उत्तर देताना अनुपम खेर यांनी असे म्हटले आहे की, तुम्ही कितीही ओरडा, टीका करा, पण ‘घाबरु नका, येणार तर मोदीच’ असं उत्तर दिलं. अनुपम खेर हे सोशल मीडियावर अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे उघडपणे समर्थन करताना दिसतात. त्याचाच प्रत्यय या निमित्ताने पुन्हा आला आहे.

शेखर गुप्ता यांनी ट्‌वीट केले होते की, साठच्या दशकाचा मुलगा म्हणून मी अनेक संकटं पाहिली आहेत. ज्यात तीन पूर्ण युद्धं, अन्नटंचाई, नैसर्गिक आपत्ती यांचा समावेश आहे. फाळणीनंतरचे हे आपल्यावरील सर्वात मोठे संकट आहे. मात्र भारताने कधीच सरकारचा अभाव पाहिलेला नाही. कॉल करण्यासाठी कोणतेही नियंत्रण कक्ष नाहीत, कोणीही जबाबदारी घेत नाही. हा प्रशासनाचा पराभव आहे.

त्यावर अनुपम खेर यांनी सणसणीत उत्तर देताना म्हटले आहे की, शेखर गुप्ताजी, हे जरा अतीच झालं. अगदी तुमच्या स्टॅंडर्डपेक्षाही. कोरोना ही आपत्ती आहे ती संपूर्ण जगासाठी. या महामारीचा सामना आपण यापूर्वी कधीच केला नव्हता. सरकारवर टीका करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्यावर आरोप, टीका-टिपणी जरुर करा. पण त्याच्याशी (कोरोना) सामना करणं ही आपलीही जबाबदारी आहे. तसं तर घाबरु नका. येणार तर मोदीच !! जय हो! अशा आशयाचं ट्‌वीट अनुपम खेर यांनी केलं आहे.

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या मतदानाचा सातवा टप्पा आज पार पडत आहे. पुढच्या रविवारी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. ‘येणार तर मोदीच’ हा अनुपम खेर यांचा नारा त्याच पार्श्वभूमीवर असल्याचं बोललं जातं. यापूर्वीही अनुपम खेर अनेक वेळा पंतप्रधानांची पाठराखण करताना दिसले आहेत. पंतप्रधान मोदी आणि अनुपम खेर यांचे घनिष्ठ संबंध आहेत. जुलै 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर अनुपम खेर यांनी लिहिले होते, की पंतप्रधान मोदी हे आपल्यासाठी ऊर्जेचा स्रोत आहेत. अनुपम खेर यांची पत्नी अभिनेत्री किरण खेर चंदिगढमधून भाजप खासदार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here