गोव्यात स्थिती नियंत्रणाबाहेर; कोरोनामुळे ३८ रुग्णांचा मृत्यू

पणजी (प्रतिनिधी प्रविण म्हापसे) – कोरोनामुळे स्थिती नियंत्रणाबाहेर चालल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत आतापर्यंतचे सर्वाधिक 38 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याशिवाय दिवसभरात राज्यात 2 हजार 321 पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील एकूण मृतांची संख्या 1 हजार 55 वर पोहोचली असून, राज्यभरात 15 हजार 260 एवढे सक्रिय रुग्ण झाल्याने चिंतेत भर पडली आहे. एका बाजूला ही स्थिती असली तरी सरकारी व खासगी रुग्णालयांतील खाटा फुल्ल झाल्याने रुग्णांना खाट मिळवून देण्यासाठी नातेवाईकांची दमछाक उडाल्याचे चित्र आहे.

राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, दिवसभरात एकूण 712 जणांना प्रकृती सुधारल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या 63 हजार 483 वर पोहोचली आहे. याशिवाय 6 हजार 772 जणांच्या दिवसभरात चाचण्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांच्या (79.55 टक्के) खाली आल्यामुळे तेही चिंतेचे कारण बनले आहे.

मृतांमध्ये नावेली येथील 52 वर्षीय पुरुष, वेर्णा येथील 72 वर्षी महिला, सासष्टीतील 84 वर्षीय महिला, वास्कोतील 63 वर्षीय पुरुष, हळदोणा येथील 77 वर्षीय पुरुष, सांगोल्डा येथील 59 वर्षीय महिला, डिचोली येथील 31 वर्षीय पुरुष, शिरढोण येथील 62 वर्षीय पुरुष, कुठ्ठाळीतील 57 वर्षीय पुरुष, धारबांदोडा येथील 47 वर्षीय महिला, मडगावातील 54 वर्षीय महिला, पर्वरी येथील 33 वर्षीय महिला, डिचोली येथील 58 वर्षीय महिला, सावईवेरे येथील 38 पुरुष, पेडणे येथील 82 वर्षीय पुरुष, गुरी येथील 53 वर्षीय पुरुष, डिचोलीतील 90 वर्षीय महिला, मयडे येथील 80 वर्षीय पुरुष, चिखली येथील 59 वर्षीय महिला, कांदोळी येथील 59 वर्षीय पुरुष, वाडे येथील 64 वर्षीय पुरुष, शिरधाव येथील 59 वर्षीय पुरुष, कांदोळी येथील 33 वर्षीय महिला, कळंगुट येथील 44 वर्षीय महिला, मांद्रे येथील 75 वर्षीय पुरुष, खोर्ली येथील 62 वर्षीय पुरुष, पेडणे येथील 83 वर्षीय महिला, फोंड्यातील 75 वर्षीय पुरुष, आसगाव येथील 68 वर्षीय महिला, बेस्तोडा येथील 74 वर्षीय पुरुष, सिकेरी येथील 67 वर्षीय पुरुष, कांदोळी येथील 64 वर्षीय पुरुष, धारबांदोडा येथील 74 वर्षीय पुरुष, ताळगाव येथील 55 वर्षीय महिला आणि 40 वर्षीय पुरुष (पत्ता मिळाला नाही) यांचा समावेश आहे.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचार्‍यांनी शनिवार, रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामावर येण्याचे आदेश इस्पितळ व्यवस्थापनाने दिला आहे. आदेश मोडणार्‍या कर्मचार्‍यांवर सक्तीने कारवाई केली जाणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता आरोग्यमंत्री लॉकडाऊनच्या बाबत आपल्याशी काहीच बोललेले नाहीत,असे त्यांनी सांगितले. आपण त्यांना याबाबत विचारणार असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यात कोरोना महामारीची दुसरी महाभयंकर लाट आली आहे. त्यापासून सर्वांनीच सावध राहिले पाहिजे. राज्यात पूर्णपणे लॉकडाऊन हा पर्याय नाही. सर्वप्रथम सर्वांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे व लग्न समारंभ टाळावेत,असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी केले. लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावण्यास सुरुवात केल्यास पोलिस लग्न सोहळे बंद पाडतील.याबाबत जिल्हाधिकारी व पोलिस अधिकार्‍यांना पूर्ण अधिकार दिल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात वाढत्या कोरोनामुळे शिक्षण खात्याने शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना पुढील आदेशापर्यंत शाळेत येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. याबाबतचे परिपत्रक संचालक दिलीप भगत यांनी जारी केले आहे. यापूर्वी खात्याने राज्यातील शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना कोरोनाची सर्व मार्गदर्शक तत्त्वे पाळून शाळेत जावे लागणार आहे. गरजेनुसार ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्याचे निर्देश दिले होते. त्यात आता बदल करून केवळ ऑनलाईन वर्ग सुरू ठेवण्यास शिक्षकांना सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here