इराणी कबिल्याच्या दोन गटात तुंबळ हाणामारी; १५ जणांवर गुन्हा दाखल

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) – आंबिवली जवळच्या इराणी कबिल्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडल्याने हा कबिला पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अटक करण्यासाठी याच कबिल्यात घुसणाऱ्या पोलिसांवर हिंसक हल्ले करणाऱ्या इराण्यांमध्ये आता फूट पडत चालली आहे. हेच इराणी आता एकमेकांच्या जणू मुळावर उठले असून रविवारच्या घटनेत चार इराणी जखमी झाले. तर पोलिसांनी हल्लेखोर लाल इराणी याच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या इराणी कबिल्यात लपलेल्या कुख्यात गुन्हेगारांना हुडकून काढण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन करणाऱ्या पोलिसांवर सामूहिक पद्धतीने हेच इराणी हिंसक हल्ले करतात आणि आपल्या माणसाला पोलिसांच्या तावडीतून सोडवून नेतात. या हल्ल्यांत पोलिस जखमीही होतात. अशा आतापर्यंत अनेक घटना ज्या इराणी कबिल्यात घडल्या आहेत त्याच कबिल्यात रविवारी संध्याकाळच्या सुमारास उलटे चित्र दिसून आले. इराण्यांमध्ये दोन गट पडले असल्याचे हाणामारीच्या घटनेनंतर दिसून येते. या कबिल्यात राहणाऱ्या कौसर जाफरी (वय-२५) या जखमी महिलेच्या जबानीवरून खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कबिल्यात असलेल्या मस्जिदच्या बाजूला २५ वर्षीय कौसर जाफरी राहते. तेथेच राहणाऱ्या लाला समीर इराणी याने रविवारी सायंकाळ ६ वाजण्याच्या सुमारास लाल इराणी, अमजद इराणी,अब्बास इराणी, सलमान इराणी, समीर इराणी, हसन इराणी, वसीम इराणी, हैदर इराणी, महंमद इराणी, कासीम इराणी आणि अन्य ५ जण लाठ्या-काठ्या आणि नंग्या तलवारी घेऊन जमा झाले. यावेळी कौसरच्या मदतीला तिचे मित्र बिलाल, शिराज इराणी आणि बगदादी इराणी हे धावून आले. तू सल्वी युसुफ सय्यद इराणी सोबत का फिरत आहेस, तसेच त्याच्यासोबत का राहतेस ? असा जाब विचारल्याने कौसर हिने त्याला तू मला विचारणारा कोण आहेस? सल्वी माझा मित्र असून मी कुणाबरोबरही फिरेल, असे उत्तर दिले.

त्यामुळे लाला इराणी भडकला. यावर संतापलेल्या लाल इराणी आणि त्याच्या १४ साथीदारांनी कौसरसह बिलाल, शिराज आणि बगदादी यांच्यावर जीवघेणा हल्ला चढविला. यात ४ जणांना गंभीर दुखापत झाली. भरवस्तीत सदरचा प्रकार घडल्याने इराणी कबिल्यात या हल्लेखोर गटाने सशस्त्र दहशत निर्माण केली. मुख्य हल्लेखोर लाला इराणी याने हातातल्या नंग्या तलवारीने कौसरवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वार तिने थोडक्यात हुकवला. या हल्ल्यात बिलाल हा गंभीर जखमी झाला. तर कौसर, शिराज आणि बगदादी हे ही जखमी झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कबिल्यातल्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक चौकीतल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे मोठा अर्नथ टळला.

या प्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात जखमी कौसर हिच्या फिर्यादीवरून लाल इराणीसह १५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पोलिसांच्या समक्ष घडल्याचे व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून येते. या घटनेनंतर हल्लेखोर इराणी भूमिगत झाले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत एकाही हल्लेखोराला अटक केली नाही. मात्र या घटनेनंतर इराणी कबिल्यात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

कौसर ही सल्वी याच्याबरोबर फिरत असली तरी सल्वी पोलिसांचा टिप्पर असल्याचा संशय हल्ला करणाऱ्या टोळक्यांना होता. त्यामुळेच हा हल्ला करण्यात आला आल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. सल्वी याचे सततचे पोलिसांबरोबर संबंध येत असून डीसीपी, एसीपी कार्यालय, तसेच खडकपाडा पोलिसांबरोबर त्याचे चांगले संबंध असल्याचे बोलले जात आहे. इराणी कबिल्यामधील कुठल्याही भानगडी पोलिसांपर्यंत पोहोचवत असल्याचा दाट संशय इराणी कबिल्यात पसरला होता. टिपरगिरीमुळेच कौसर हिच्यावर हा हल्ला करण्यात आल्याची गुन्हेगारांच्या इराणी कबिल्यात चर्चिली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here