मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढल्या आहेत. परमबीर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिले आहेत. परमबीर यांच्याविरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यातील तत्कालीन निरीक्षक अनुप डांगे यांनी तक्रार केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
परमबीर सिंग यांची प्राथमिक चौकशी करण्याचा हा गृह विभागाचा आदेश २० एप्रिलचा असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांना हे आदेश देण्यात आले आहेत. हा आदेश देताना अनुप डांगे यांनी २ फेब्रुवारी २०२१ रोजी केलेली तक्रार आणि याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी २५ मार्च २०२१ रोजी दिलेला अहवाल तसेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचा ७ एप्रिल २०२१ रोजीचा अहवालही सोबत जोडण्यात आला आहे. अनुप डांगे यांनी केलेल्या तक्रारीतील सर्व मुद्द्यांची प्राथमिक चौकशी करून याबाबतचा अहवाल शासनास लवकरात लवकर सादर करावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा गोपनीय आदेश आज समोर आला आहे.
अनुप डांगे यांना गेल्यावर्षी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर हे निलंबन रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी दोन कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप डांगे यांनी केला होता. याबाबत त्यांनी राज्याच्या अतिरिक्त गृह सचिवांना २ फेब्रुवारी रोजी पत्र लिहिले होते. या पत्रात अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींशी परमबीर यांचे कनेक्शन असल्याचा आरोपही डांगे यांनी केला होता. याच आरोपांची आता चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, डांगे यांना अलीकडेच पुन्हा सेवेते घेण्यात आलेले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले आहेत. सचिन वाझे यांना देशमुख यांनी दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा दावा परमबीर यांनी पत्रात केलेला आहे. याप्रकरणी सध्या सीबीआय चौकशी सुरू असतानाच परमबीर यांच्यावरही गंभीर आरोप होत आहेत. सध्या अकोला येथे पोलीस नियंत्रण कक्षात असलेले पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी परमबीर यांच्यावर लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीर हे ठाण्यात पोलीस आयुक्त असताना त्यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मला जबाब नोंदवण्यासाठी बोलावल्यास मी ते पुरावे सादर करेन, असे पत्र घाडगे यांनी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना लिहिले आहे. या पत्राची प्रत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही पाठवली आहे.






