राज्य सरकारचा मोठा निर्णय : १८ ते ४४ वयोगटातील जनतेचं मोफत लसीकरण

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – करोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारनं मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचं मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने येत्या १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचे करोना लसीकरण करण्याचे सर्व राज्यांना आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातही लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यात प्रामुख्यानं मोफत लसीकरणाच्या मुद्द्यावरुन चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारकडून मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

१८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्यात येणार आहे. म्हणजेच या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण पणे लसीचे १२ कोटी डोस लागणार असल्याची माहिती आहे. मोफत लसीकरणामुळं राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडणार आहे.

लस आज आपल्याला लगेच उपलब्ध होत नाहीय. त्यामुळं १ मेपासून लगेचच लसीकरण सुरु होणार नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ – ४४ वयोगटातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सबुरीनं घ्यावं लागेल. लसीच्या कमतरतेमुळं १मेपासून लसीकरण शक्य नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. १८ ते ४४ वयोगटातील ५ कोटी लोकांचं लसीकरण एकाच वेळी करणं शक्य नाही. त्यामुळं एका समितीची स्थापना करण्यात येणार आहे. ही समिती एक मायक्रोप्लानिंग करणार आहे. त्यामध्ये वयोगटानुसार लसीकरण राबवण्याची चर्चा करण्यात येईल. १८- ४४ वयोगटासाठी वेगळी लसीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. तिथं फक्त याच वयोगटातील लोकांचं लसीकरण करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here