पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – दुसऱ्या तरुणासोबत बोलत असल्याच्या रागातून प्रियकरानेच प्रेयसीचा गळा दाबून खून केल्याची उकल विमानतळ पोलिसांनी केली आहे. लोहगाव परिसरात मंगळवारी झालेल्या महिलेच्या खूनाचा छडा लावण्यात विमानतळ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी 24 तासाच्या आत आरोपीला अटक केली आहे.
संतोष महादेव राठोड (वय 31,रा. साईपार्क लेबर, कॅम्प लोहगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनिता तुकाराम राठोड (वय 28, रा.मांडेआळी लोहगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहगावमधील कुबेर पार्कसमोरील मोकळ्या जागेत एका महिलेचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला होता. त्यानंतर पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरूवात केली होती. दरम्यान, पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी महिलेच्या नातेवाईकांना शोधले. त्यानंतर त्यांनी महिलेचे कपडे व अंगावरील खुणा दाखविल्यावर नातेवाईकांनी तिला ओळखले.
संबंधित महिलेचे नाव अनिता राठोड असून तिचे संतोष राठोड याच्याबरोबर प्रेमसंबंध होते. संतोष तिला वेळोवेळी पैशांची मदत करीत होता. अनिता इतर लोकांबरोबर बोलत असल्याचा राग त्याला होता. त्याने अनिताला समजावूनही फरक न पडल्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर त्याने अनिताला 26 एप्रिलला रात्री 11.30 वाजता मोटारसायकलवरुन कुबेर पार्कमध्ये आणले. शेतामध्ये तिचा गळा दाबला. ती बेशुद्ध झाल्यावर त्याने दगड अनिताच्या डोक्यात मारून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक मंगेश जगताप अधिक तपास करीत आहेत.






