पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – कोरोना प्रादुभार्वातही ऑनड्युटी कार्यरत असलेले वाहतूक विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाजीराव मोळे (वय 58) यांचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे पुणे पोलीस दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे पोलीस दलातील मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 14 वर पोहोचली आहे.
ऑनड्युटी असताना मोळे यांना 10 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर खराडीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा बुधवारी मृत्यू झाला. मागील 18 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बुधवारी त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांचे निधन झाले.
विमानतळ वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी वारजे पोलीस ठाणे, स्पेशल ब्रँचमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून काम केले होते. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.






