मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – सदरक्षणाय खलनिग्रहणाय या घोषवाक्याची शपथ घेऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपले पोलीस बांधव जीव धोक्यात घालून दिवसरात्र जनतेची सेवा करत आहेत. या महामारीच्या परिस्थितीत २४ तास ड्युटी करत असताना पोलीस कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना कोव्हीड झाला तर त्यांना बेड्स आणि ऑक्सिजन उपलब्ध होईल की नाही याची भिती त्यांच्या मनात होती. मात्र पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देत दिनांक २७ एप्रिल २०२१ रोजी राज्य पोलीस नियंत्रण कक्ष यांच्याद्वारे कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे.
कोरोना काळात दिवसरात्र घराबाहेर राहून जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांना व त्यांच्या कुटुंबियांना कोव्हीड होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु राज्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. तसेच गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले आहेत. अशा वेळेस जनतेच्या रक्षणकर्त्या पोलिसांचे रक्षण करण्यासाठी माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) यांच्याद्वारे आदेश काढण्यात आला आहे. या आदेशात आपत्कालीन वापराकरिता राज्य पोलीस नियंत्रण कक्ष येथे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशीन उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालयातील पोलीस अधिकारी, मंत्रालय अधिकारी, पोलीस अंमलदार व मंत्रालय कर्मचारी यांच्याकरिता उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील पती, पत्नी, मुलगा, मुलगी, आई, वडील यांच्यासाठीदेखील उपलब्ध करण्यात येईल, असेही या आदेशात म्हंटले आहे. ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीनची आवश्यकता असल्यास नियंत्रण कक्ष अधिकारी किंवा राज्य पोलीस नियंत्रण कक्ष यांना 022-22026636 / 22822631 संपर्क साधून मागणी करता येईल.






