नवी दिल्ली – आयुष्याच्या उतारवयात जोडीदार सोडून गेला की एकटे राहण्याची पाळी दुसऱयावर येते. आयुष्यभराची साथ सर्वांना मिळेलच असं नाही. वृद्धापकाळात दोघांपैकी कुणाला तरी एकाला एकटय़ानं जगावं लागतं. अशाच एका 71 वर्षांच्या वडिलाचे, त्यांच्या मुलीने पुन्हा एकदा लग्न लावून दिले आहे. या मुलीनेचं आपल्या वडिलांच्या दुसऱया लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आदिती नावाच्या मुलीने वडिलांच्या लग्नाचा फोटो शेअर करत आईच्या निधनानंतर पाच वर्षे एकटं राहिल्यानंतर वडिलांनी 71 व्या वर्षी एका विधवेशी लग्न केल्याचे सांगितले आहे. या मुलीने केलेलं हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. पाच वर्षांपासून एकटं राहत असलेल्या आपल्या वडिलांसाठी मुलीने उचलेलं हे पाऊल कौतुकास्पद असून, अनेकांनी तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे.
‘माझ्या वडिलांनी पुन्हा लग्न करावे अशी माझी इच्छा होती, कारण कोणीचं एकटं राहू नये. पुनर्विवाहासाठी देशात कायदेशीर नियम नाहीत. काही अशा स्त्रिया होत्या ज्यांनी पैसे मागितले होते. समाज त्यांना स्वीकारेल की नाही आम्हाला माहीत नाही. ते दोघेही एकमेकांना किती अनुकूल आहेत, हेदेखील माहीत नाही’ असे ट्विट त्या मुलीने केले आहे.






