मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या परिवाराचा जीव वाचवण्यासाठी आणि महाराष्ट्रात होणाऱ्या पोलिस भरती अश्या विषयांना घेऊन महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष / संस्थापक राहुल दुबाले मातोश्रीवर जाणार होते. पोलिसांच्या विविध प्रश्नांवर तसेच त्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे आंदोलन करणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळताच बीडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी राहुल दुबाले यांना नोटीस पाठवली.
पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक/अध्यक्ष राहुल दुबाले वारंवार शासनाला विनंत्या करत होते. हिंगोली मध्ये इंगोले पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल यांनी काही दिवसांपूर्वी ऑडिओ क्लिपद्वारे उपचार द्या म्हणून मागणी केली होती. परंतु काल त्यांची प्राणज्योत मालवली. असेच अंबेजोगाई येथे ऑक्सिजन बेड मिळाला नाही म्हणून एक पोलीस कर्मचारी शहीद झाले. या घटनांमुळे राहुल दुबाले यांनी सरकारवर रोष व्यक्त केला. ते म्हणाले “काय करायचे आमच्या परिवाराने? कोणाकडे मदत मागायची? सरकार त्यांच्याच धुंदीत आहे. आमच्या वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पूर्ण अधिकार द्या, मग बघा आमचे अधिकारी आमच्या पोलीस परिवाराच्या केसाला पण धक्का लागू देत नाहीत. सरकारला पोलीस कॉलनी आणि पोलीस स्टेशनच्या मसनवाटा झाल्यावर जाग येणार का?”

महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस वसाहतीत वॅक्सिन कॅम्प लावून सर्वांचं लसीकरण करण्यात यावे, तसेच स्वतंत्र रेमडेसीवीर इंजेक्शन, ऑक्सिजन व व्हेंटिलेटर पोलिसांसाठी उपलब्ध करावे, मागील वर्षीप्रमाणे ५० वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्याचे आदेश द्यावे या सर्व गोष्टी पोलिसांसाठी त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी ही भेट घेत असल्याचे संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले यांनी सांगितले. तसेच पोलिसांचा ताण कमी व्हावा यासाठी पोलीस पाल्य रस्त्यावर कर्तव्य बजावण्यास तयार आहेत, असेदेखील त्यांनी सांगितले. अशा नोटिसा पाठवून जर सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असेल तर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शांत बसणार नाही, असे म्हणत दुबाले यांनी सरकारवर संताप व्यक्त केला.






