कोलकाता – गेल्या महिनाभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज रविवारी जाहीर होत आहे. त्यामुळे या निवडणुकीत ममतांचा तृणमूल काँग्रेस की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजप, यापैकी कोण बाजी मारणार, याचा फैसला होईल. कोणत्याही परिस्थितीत पश्चिम बंगाल काबीज करायचाच या इर्षेने भाजपने आपली संपूर्ण प्रचारयंत्रणा या निवडणुकीत उतरवली होती. तर अस्तित्त्वाची लढाई लढत असलेल्या ममता बॅनर्जी यादेखील चवताळून भाजपशी दोन हात करण्यासाठी ठामपणे उभ्या ठाकल्या होत्या.
या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात अनेक नाट्यमय घटना, आरोप-प्रत्यारोप, फोडाफोडी आणि राजकीय शह-प्रतिशह पाहायला मिळाले. गेल्या निवडणुकीत अवघ्या तीन जागा मिळालेला भाजप या निवडणुकीत शंभरी ओलांडेल, अशा अंदाज एक्झिट पोल्सनी वर्तविला आहे. तर ममता बॅनर्जी या काठावर का होईना, पण पश्चिम बंगाल राखतील, असा जाणकारांचा होरा आहे. आता हे अंदाज कितपत खरे ठरतात, हे आज स्पष्ट होईल.
विधानसभेच्या 294 जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत मतदान झाले होते. सत्तेच्या सिंहासनावर बसण्यासाठी 148 ही मॅजिक फिगर आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमताच्या या आकड्यापर्यंत पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.






