नाशिक (विशेष प्रतिनिधी) – करोनाच्या सद्यःस्थितीचा आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आले असता राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विषयी आक्षेपार्ह, शिवराळ भाषेचा वापर असलेला व्हिडीओ तयार करून फेसबुक सारख्या समाजमाध्यमावर पोस्ट केल्याप्रकरणी पाच संशयितांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात नाशिकरोड भाजप मंडळ अध्यक्ष हेमंत गायकवाड यांनी शनिवारी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनुसार विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिक जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार जयकुमार रावल, खासदार डॉ भारती पवार, आमदार सीमा हिरे, राहुल ढिकले,महापौर सतीश कुलकर्णी आदी शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता पालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयाच्या दौऱ्यावर आले होते.
याप्रसंगी अज्ञात इसमांनी फडणवीस यांना उद्देशून आक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि हा व्हिडीओ फेसबुकवर प्रसारित करून राजकीय तेढ निर्माण करण्यासह फडणवीस यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. रतन खालकर, संकेत भोसले, प्रमोद कोहंकडे, राहुल जोशी आणि बंटी ठाकरे या पाच जणांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंट वरून हा व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आल्याने या पाच जणांविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






