पाटणा (बिहार) – राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालूप्रसाद यादव यांची तीन वर्षांनंतर जामिनावर मुक्तता झाली. दिल्लीच्या एम्समधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, आता ते मुलगी मीसा भारतीच्या घरी राहण्यास गेले आहेत. लालूप्रसाद यादव यांची प्रकृती स्थिर नसल्याने आणखी काही दिवसांसाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवले जाणार आहे. शुक्रवारी डिस्चार्ज मिळालेल्या लालूप्रसाद यादव यांना 17 एप्रिल रोजी हायकोर्टाने जामीन मंजूर केला होता. मात्र, कोरोना संक्रमणाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे 12 दिवसांचा उशीर झाला.
17 एप्रिल रोजी न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांनी लागू यांच्या जामिनावर निर्णय दिला होता. त्यांच्या वकिलांनी लगेच दुसर्या दिवशी प्रक्रियेसाठी प्रयत्न केले. मात्र, झारखंड स्टेट बार कौन्सिलने कोर्टात कोणत्याही वकिलांनी काही दिवस न जाण्याचा निर्णय घेतल्याने जामिनास उशीर झाला.
लालूप्रसाद यादव यांना जामीन मिळाला असला, तरी न्यायालयाने काही अटी घातल्या आहेत. जामिनाच्या कालावधीत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये, घराचा पत्ता बदलू नये आणि पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा तसेच परवानगीशिवाय बाहेर प्रवास करू नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत. चारा घोटाळ्याशी संबंधित इतर प्रकरणांत लालूप्रसाद यांना जामीन मंजूर झाला होता. मात्र, दुमका कोषागार प्रकरणात जामिनाची प्रतीक्षा होती. या प्रकरणात त्यांना 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. आता जामीन मिळाल्यानंतर ते मुलगी मीसा हिच्या घरी मुक्कामास गेले आहेत.






