कोथरूड पोलिसांमुळे वाचले आयसीयुमधील 20 रूग्णांचे प्राण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – रुग्णालयातील ऑक्सिजन संपत आल्याची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांच्या कामगिरीमुळे पुण्यात नाशिक दुर्घटनेची पुनरावृत्ती टळली आहे. कोथरूड परिसरातील एका हॉस्पिटलमधील ऑक्सिजन अर्धा ते पाऊण तासांपुरताच शिल्लक होता. त्याठिकाणी 20 ते 22 रुग्ण ऑक्सिजनवर उपचार घेत होते. त्यानुसार माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी जवळच्या हॉस्पिटलमधून ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध केले. त्याशिवाय शिवाजीनगर परिसरातून वाहनांचा इस्कॉर्ट करून ड्युरा सिलेंडर आणून बसविला. पोलिसांच्या तत्परतेमुळे ऑक्सिजनवर उपचार घेणाऱ्या 20 रुग्णांचे प्राण वाचले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोथरूड पोलिसांचे कौतुक केले आहे.

कोथरूड पोलिसांकडून शनिवारी सकाळी त्यांच्या हद्दीतील हॉस्पिटलशी संपर्क करून ऑक्सिजनबाबत माहिती घेण्यात येत होती. त्यावेळी कृष्णा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने हॉस्पिटलचा ऑक्सिजन साठा फक्त 30 ते 45 मिनिटे शिल्लक असून कोठूनही ऑक्सिजन मिळत नसल्याची माहिती कोथरूडचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांना दिली. त्याशिवाय प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये 20 रुग्ण ऑक्सिजनवर असल्याचे कळविले. त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यासाठी बेड देखील शिल्लक नसल्याचे प्रशासनाने सांगितले. गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कोथरूड पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हद्दीतील विविध हॉस्पिटलमध्ये पाठवून ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

अखेर सूर्यप्रभा व सह्याद्री हॉस्पिटलकडून काही ऑक्सिजनचे सिलेंडर मिळाले. पण, ते देखील काही वेळच चालू शकणार होते. त्यामुळे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सहायक आयुक्त गजानन टोम्पो यांना परिस्थितीची माहिती दिली. त्यानुसार त्यांना शिवाजीनगर परिसरात ड्युरा सिलेंडर असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मेट्रोची क्रेन एस्क़ॉर्ट करून सिलेंडर शिवाजीनगर परिसरातून आणला. कोथरूड पोलिसांच्या तत्परतेमुळे 20 रुग्णांच्या जीव वाचविण्यात यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here