अनावश्यक सीटी स्कॅन वाढल्याने कोरोनाग्रस्तांना कर्करोगाचा धोका – डॉ. गुलेरीया

नवी दिल्ली – आजारापेक्षा आजाराची भीती अधिक भयंकर आणि प्रसंगी जीवघेणी ठरते. या भीतीपोटी अनेक चुका घडतात आणि आजार दुसरीकडेच राहून नव्या संकटाला निमंत्रण मिळते. कोरोनाच्या बाबतीतही हेच होत आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे गरज नसतानाही सीटी स्कॅन मोठय़ा प्रमाणात केले जात आहेत. त्यामुळे कोरोना बाजूलाच राहील आणि सीटी स्कॅनच्या रेडिएशनमुळे रुग्णांना भविष्यात कर्करोगाचा धोका वाढेल असा इशारा ‘एम्स’ रुग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरीया यांनी दिला आहे.

‘सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांचा सीटी स्कॅन करण्यात काहीच अर्थ नाही. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या फुप्फुसात पॅचेस दिसले तरी ते बरे होऊ शकतात. 300 ते 400 एक्स-रेमधून जितके रेडिएशन होते तितके एका सीटी स्कॅनमुळे होते. सारखे सीटी स्कॅन केले गेले तर कर्करोगाचा धोका उद्भवू शकतो.’ असे डॉ. गुलेरीया यांनी सांगितले.

डॉ. गुलेरीया हे वैद्यकीय निदान तंत्रज्ञानाबाबत बोलत होते. ‘कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर सीटी स्कॅन केलाच पाहिजे असे अनेकांना वाटते. लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या फुप्फुसात सीटी स्कॅनमध्ये 30-40 टक्के पॅचेस दिसतात. ते कोणत्याही उपचाराविना दूर होऊ शकतात. सौम्य लक्षणे असल्यास घरीच आयसोलेट होण्यात काहीच अडचण नसते आणि ऑक्सीजनचे प्रमाण कमी झालेले असेल तर सीटी स्कॅन काहीच उपयोगाचा नसतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here