मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – महिंद्रा लॉजिस्टिकने मंगळवारी ऑक्सिजन ऑन व्हील्स ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली, जी एक मोफत सेवा असेल. याद्वारे ऑक्सिजन उपलब्ध करुन देण्यासाठी उत्पादक आणि रुग्णालये तथा वैदकीय केंद्र जोडली जातील. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, नाशिक आणि नागपूर अशा शहरांमध्ये ही सेवा सुरू केली जाईल, असे महिंद्रा लॉजिस्टिकने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ऑक्सिजन सिलिंडर्सचा पुरवठा अधिक सुरक्षित व वेगवान करण्याच्या उद्देशाने कंपनी राज्यात एकूण 100 वाहने तैनात करणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा म्हटले आहे की, ही सेवा महिंद्रा लॉजिस्टिकच्या सीएसआर उपक्रमांतर्गत होईल, ज्याने या प्रकल्पासाठी प्रशासन आणि स्थानिक सरकारी संस्थांशी भागीदारी केली आहे. दिल्लीसह इतर शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्याबाबत शहरी प्रशासन आणि सरकारी विभागांशी चर्चा सुरु असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. वैद्यकीय ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या सर्व राज्यात ही सेवा सुरु करण्याचा विचार सुरु असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
महिंद्रा कंपनीनेदेखील या कोरोना साथीच्या आजारात लोकांना मदत करण्यासाठी बोलेरो पिकअप ट्रकचा वापर केला आहे. त्याच्या मदतीने ही कंपनी ऑक्सिजनचे वितरण करत आहे. महिंद्रा आणि महिंद्रा कंपनीने या उपक्रमाला Oxygen on Wheels असे नाव दिले आहे. या उपक्रमाद्वारे गरजूंपर्यंत आणि रुग्णालयात ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम केले जात आहे.






