मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – कोरोनाने अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्य लोकं असो किंवा कलाकार प्रत्येकाला कोरोनाचा फटका बसत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. कोरोनामुळे अनेक कलाकरांनी आपला जीव गमावला आहे. अशातच आणखी एक दु:खद माहिती समोर आली आहे. ‘बापमाणूस’ या मराठी मालिकेतील अष्टपैलू कलाकार अभिलाषा पाटील यांचं कोरोनाने निधन झालं आहे.
अभिलाषा पाटील या मराठी मधील एक अष्टपैलू कलाकार होत्या. त्यांनी आजपर्यंत अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. फक्त मराठी मालिकांमध्येच नव्हे तर मराठी आणि हिंदी चित्रपटात देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या चित्रपटात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली आहे.
मराठीतील लोकप्रिय ठरलेली मालिका ‘बापमाणूस’ मध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट अभिनय केला होता. यामध्ये त्यांनी अभिनेत्री पल्लवी पाटीलच्या आईची भूमिका साकारली होती. तसेच त्यांनी बायको देता का बायको, प्रवास यांसारख्या चित्रपटातही काम केलं आहे. अभिनेत्री पल्लवी पाटीलने देखील अभिलाषा यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केलं आहे.






