ग्लोबल वॉर्मिंग, कोरोनाचा वाढता प्रकोप आदी अडचणीमुळे कोकणातील आंबा उत्पादक हवालदिल, उत्पादन अवघे ३० ते ३२ टक्के- चंद्रकांत मोकल

अलिबाग-सोगावकर – ग्लोबल वार्मिंगचा फटका कोकणातील आंब्याला खास करून हापूसला मागील पाच वर्षे सातत्याने बसत आहे. त्यामुळे सातत्याने उत्पादन घटत आहे. मागील दोन वर्षे वाईट हवामाना बरोबरच कोरोनाचा वाढता प्रकोप तसेच आर्थिक मंदीचे सावट यामुळे कोकणातील आंबा उत्पादक हवालदिल झाल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिली.

यावर्षी हवामान बदलामुळे विचित्र परिस्थिती पहावयास मिळाली.ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर, डिसेंबर २०२० पुढे जानेवारी,फेब्रुवारी २०२१ पर्यंत असा सतत अवकाळी पाऊस कोकणात बरसला. थंडीचे कमी जास्त असे विषम प्रमाण, या आपत्तीवर मात करून कोकणातील आंबा उत्पादकांनी औषधांची फवारणी करणे बरोबरच योग्य निगा राखून सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दि.१८ व १ ९ फेब्रुवारीच्या अवकाळीचा काही ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. परिणाम बागांतील आंबे गळून पडले. भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊन सगळ्या बागांच्या बागा खाली होऊन काळ्या पडल्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरीच्या तुलनेने अधिक फटका रायगड जिल्ह्याला बसला.त्यामुळे जिल्ह्यातील सरासरी उत्पादन अवघे २० ते २२ टक्केच राहिल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा यावर्षी १ महिना उशिरा फेब्रुवारी ऐवजी मार्च पासून मंडईत आला.एप्रिल संपताना अंशतःरायगडचा आंबा सुरु झाला.

दुसरीकडे देशात खास करून महाराष्ट्रात वाढलेला कोरोनाचा वाढता प्रकोप, खबरदारी म्हणून दि. १५ एप्रिल २०२१ पासून राज्य शासनाने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय त्याचे सर्वत्र चांगले परिणाम दिसत आहेत. मात्र मागील वर्षाचा लॉकडाऊन शेतकऱ्यांना नवा असताना देखील त्यांनी आंबा विक्रीसाठी अनेक चांगले पर्याय निवडले. शासनाने मागील वर्षाप्रमाणे यावर्षी देखील कृषी सेक्टर साठी नियम शिथिल केले. असे असले तरी यावर्षीची परिस्थिती मात्र मागील वर्षापेक्षा अधिक वाईट आहे. यावर्षीचे आंब्याचे सरासरी उत्पादन कमी आहे.शेतकऱ्याला वाढीव भाव मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु कोरोना बाधित होण्याचा वेग वाढत आहे. त्यामुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. तसेच आर्थिक दुरावस्था कोरोनाच्या भीतीमुळे ए.पी.एम.सी. मंडईत ग्राहकांची वानवा आहे.

छोट्या मंडईत व शहरांमध्ये शुकशुकाट आहे. राज्याबाहेर व निर्यातीच्या बाबतीत देखील हीच स्थिती आहे. आंबा तोडणी बरोबरच टेम्पो, ट्रक वाहतूक कर्मचारी प्रत्यक्ष विक्री व्यवस्थेतील कर्मचारी वर्ग यांची सुरक्षा पण महत्वाची आहे. कार्पोरेट सेक्टरपण अंशतः सुरु आहे. साहजिकच आंब्याबरोबरच अन्य फलोत्पादनाला उठाव कमी आहे. साहजिकच फळांच्या राजाला भाव मिळत नाही. याही परिस्थितीत कोकणातील शेतकरी कोरोना लॉकडाऊनचे नियम पाळून शहरातील हौसिंग सोसायट्यांना आपला माल थेट विकत आहेत. त्यांच्या हाती निश्चित दोन पैसे अधिक मिळत आहेत.

सर्वात महत्वाची समस्या आपल्या आंब्याच्या अगोदरच ए.पी.एम.सी.व अन्य मंडईत कोकण हापूसला साधर्म्य मात्र चवीला निकृष्ट असलेल्या कर्नाटक,आंध्र आंब्याची मोठ्या प्रमाणात होणारी आवक व या अवघ्या ३५/४० रु. किलोने विकल्या जाणा-या आंब्यामुळे कोकण हापूसवर मोठा परिणाम होत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीने आम्ही राज्याचे पणन सचिव श्री. अनुपकुमार यांना लेखी निवेदन देऊन ज्या ज्या ठिकाणी हा आंबा येईल त्या विक्रेत्याने त्या बॉक्सवर कर्नाटक,आंध्रचा आंबा म्हणून त्याचा उल्लेख करावा यासाठी पाठपुरावा केला आहे. शासनाच्या वतीने ए.पी.एम.सी.ला तशा सूचना देण्यात आल्या. मात्र ए.पी.एम.सी.मधील दलाल व्यापारी चांगला नफा कमविण्याच्या उद्देशाने हा आंबा विक्रीत जादा रस दाखवितात व त्याचा मोठा आर्थिक फटका कोकण हापूसला बसतो.

श्री. सतीश सोनी यांची नुकतीच ए.पी.एम.सी. नवी मुंबईचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. पणन संचालक राहिलेल्या श्री. सोनी यांनी आंबा,भाजीपाला, फळफळावळ व सर्व फलोत्पादनातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्या ज्ञात असून त्यांनी त्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. कर्नाटक,आंध्र आंब्यामुळे कोकण हापूसच्या आर्थिक उत्पन्नावर होत असलेला परिणाम, भाजीपाला, फळे,यांच्या नियमन मुक्तीमुळे दलाल आडते याची आडत बंद झाल्यामुळे त्यांचे शेतकर्यांच्या बाबतीत असहकाराचे व उदासीन धोरण आदी जिव्हाळ्याच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते कष्ट घेतील असा विश्वास शेवटी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here