ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 82 गोण्या तांदूळ, आठ गोण्या गहू आणि दोन पीकअप टेम्पो असा दहा लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय 25), रेवणनाथ मुरलीधर ढेरे (वय 39), श्रीकांत प्रकाश ढेरे (वय 25, सर्व रा. वीट, ता. करमाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
करमाळा तालुक्यातील काही लोक रेशनचा तांदूळ आणि गहू काळ्या बाजारात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कर्जत पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कर्जत-राशीन रस्त्यावर सापळा रचून धान्य घेऊन जाणाऱ्या दोन पीकअप टेम्पो थांबवून त्यांची तपासणी केली. त्यावेळी त्यात 82 गोण्या तांदूळ आणि आठ गोण्या गहू आढळून आला.
पोलिसांनी दोन्ही टेम्पोंतील तिघांना या धान्याबाबत विचारपूस केली असता, हे धान्य रेशनिंगचे असून, काळ्या बाजारात विक्री करणार होतो, अशी कबुली त्यांनी दिली. यानंतर या तिघांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 55 किलो वजनाच्या 72 गोण्या तांदूळ, 8 गोण्या गहू, दोन पीकअप टेम्पो असा एकूण 10 लाख 44 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, हवालदार तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकटे यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ तपास करीत आहेत. करमाळ्याच्या तहसीलदार समीर माने, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, तलाठी प्रशांत गौडचर यांचीही या कारवाईत मदत झाली.






