- पी.आर.हायस्कूलच्या विशाखा माळी आणि मयुरी आफ्रे या सावित्रीच्या लेकी सन्मानित
- प्रत्येकी रूपये पाच हजाराचा पुरस्कार प्रदान
धरणगाव (उपसंपादक प्रा पी एम पाटील) – येथील एकशे सात वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रातील नामवंत शतकोत्तरी पी.आर.हायस्कूलच्या मुकुटात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला असून महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित ‘बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ या योजने अंतर्गत पी. आर. हायस्कूलच्या विशाखा विजय माळी व मयुरी दिलीप आफ्रे या दोन गुणवंत विद्यार्थिनींना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा पुरस्कार देण्यात आला.
आज पी.आर.हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा साहित्यिक डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते कोरोना काळातील नियमांचे पालन करून छोट्याशा कार्यक्रमात या विद्यार्थिनींना धनादेश देऊन गौरव करण्यात आला.धरणगाव तालुक्यात फक्त पी.आर. हायस्कूलच्याच विद्यार्थिनींना हा सन्मान प्राप्त झाला आहे.
मार्च २०२२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत विशाखा माळी हिने ९६.२० टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला होता. त्याबद्दल तिला धरणगाव शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री माननीय नामदार गुलाबरावजी पाटील यांच्याकडून स्कूटी भेट मिळाली होती. तर मयुरी आफ्रे हिने ९५.६० टक्के गुण मिळवून मुलींमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता.याच गुणवत्तेच्या बळावर या विद्यार्थिनींना शिक्षण विभागाच्या वतीने सन्मानित करण्यात आले. धरणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय अशोक बिऱ्हाडे साहेब यांनी ह्या विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे. यावेळी धरणगाव पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे प्रतिनिधी सुनील पाटील, विद्यार्थिनींचे पालक उपस्थित होते.






