किर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळे यांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक मदत मिळावी – रोहिणीताई खडसे खेवलकर

जळगाव (प्रतिनिधी सिध्दांत सोनवणे) – महाराष्ट्र ही भागवतधर्माची ध्वजा फडकविणाऱ्या संतांची भूमि आहे. कीर्तन महाराष्ट्रीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा जपत असलेल्या महाराष्ट्रात कीर्तन परंपरेला अत्यंत मानाचे स्थान असून कीर्तनाची अत्यंत समृध्द परंपरा लाभली आहे.

कीर्तनाचे अंतिम ध्येय परमार्थ असले तरी कीर्तनकार आपल्या कीर्तनात माणसाला दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रापंचिक समस्यांवरही भाष्य करतो. कीर्तनाच्या माध्यमातून तो वेगवेगळया सामाजिक प्रश्नांना वाचा फोडतो आणि व्यवहारचातुर्य आणि नैतिक आचरणावर प्रबोधनही करतो. पुराण आणि इतिहासातील आदर्शांचे उदात्तीकरण करून मानवी जीवनातील त्यांचे महत्व विषद करतो. अशाप्रकारे कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सतत समाजप्रबोधन करीत असतो परंतु सध्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात भितीचे वातावरण आहे. मार्च २०२० पासून तर आजपर्यंत या कारणाने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण किर्तनकारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. शासनाच्या माध्यमातून आतापर्यंत समाजातील अनेक घटकांना शासनाने मदत जाहीर केलेली आहे. परंतु किर्तनकार, टाळकरी व भजनी मंडळे या पासून वंचित आहेत. जवळपास ९०% किर्तनकरांचा उदरनिर्वाह हा किर्तनावर अवलंबून आहे.

किर्तनकारांना शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी यासाठी जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्षा तथा अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा जळगावच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले व या बाबतीत आपण राज्य सरकारकडे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

यावेळी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह ॲड.पद्मनाभ देशपांडे, सहकार्यवाह योगेश शुक्ल, कार्यकारिणी सदस्य संदीप घोरपडे , अनिल वराडे, अनिल पाटील, अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, अशोक पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here