बंगळुरु (कर्नाटक) – कर्नाटकात व्हेंटिलेटर व ऑक्सिजनच्या तुटवडय़ामुळे आणखी आठ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे 72 तासांत ऑक्सिजनअभावी मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 40 वर गेली आहे. केंद्रासह राज्यात सत्तेवर असलेले भाजप सरकार कर्नाटकातील हे मृत्यूचे तांडव कधी रोखणार, असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून केला जात आहे.
व्हेंटीलेटर व ऑक्सिजनअभावी मृत्यू होण्याचे सत्र सुरू आहे. हुबळी रुग्णालयात 5 रुग्णांचा मृत्यू झाला. प्रशासनाने ऑक्सिजन तुटवडय़ाचा इन्कार केला. मात्र या पाचही जणांना ऑक्सिजन न मिळाल्यामुळेच प्राण गमवावा लागल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. त्यानंतर रुग्णांच्या मृत्यूचे कारण तपासण्यासाठी जिल्हा प्रशासनाने समिती स्थापन केली. रुग्णालयात 30 जंबो ऑक्सिजन सिलिंडर्स असून 21 रुग्णांवर उपचार सुरू होते.
याठिकाणी 2 केएल क्षमतेचे ऑक्सिजन कंटेनर्स आहेत तर नैसर्गिक हवेच्या माध्यमातून 85 हजार लिटर ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते. जर ऑक्सिजनची कमी असती तर आम्हाला सिस्टमकडून आधीच अलर्ट मिळाला असता, अशी संतापदायक सारवासारव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत मडिनकर यांनी केली. दोन दिवसांपूर्वीच चामराजनगर जिल्हा रुग्णालयात दोन तासांच्या आत 24 रुग्णांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला होता.






