मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – मुंबईतील संघटित गुन्हेगारीला आळा घालणारा, गँगवॉर संपविणारा एक धडाकेबाज अधिकारी म्हणून मुंबई पोलीस दलात ख्याती असलेल्या दया नायक यांची आज विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात बदली करण्यात आल्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी जारी केले.
दया नायक हे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या जुहू युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते. दीड वर्षापूर्वी त्यांची खार पोलीस ठाण्यातून एटीएसच्या जुहू युनिटला नियुक्ती करण्यात आली होती. यादरम्यान त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली होती. ड्रगमाफियांचे कंबरडे मोडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत तसेच मातोश्री बंगल्यावर धमक्यांचे फोन करणाऱ्या एका आरोपीला दया नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनीच कोलकाता येथे सापळा रचून अटक केली होती.
अशा या कार्यक्षम अधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही तक्रार नसताना तसेच कार्यकाळ संपण्यापूर्वीच (दीड वर्ष) एटीएसमधून उचलबांगडी करण्यात आल्यामुळे पोलीस दलात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील पोलिसांच्या जातपडताळणी विभागात नायक यांची बदली करण्यात आली आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार विष्णू कोथमिरे यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे.






