नवी दिल्ली – वैशाख महिना सुरू होण्याआधीच सूर्य जणू आग ओकू लागल्याने अंगाची लाहीलाही होत असतानाच मान्सूनच्या आगमनाची आनंदवार्ता मिळाली आहे. यंदा मान्सून सर्वसाधारण तारखेला म्हणजेच 1 जूनला केरळमध्ये धडकेल आणि 10 जूनपर्यंत तो कोकणात दाखल होईल, असा अंदाज पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव आणि हवामान शास्त्रज्ञ माधवन राजीवन यांनी गुरुवारी वर्तवला. त्यांनी ट्विट करून देशातील शेतकऱयांना ही मोठी खूशखबर दिली.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तिथल्या भागांना उकाडय़ापासून तात्पुरता दिलासा मिळाला. मात्र मुंबईसह बऱयाच भागांत उष्णतेत वाढ झाली आहे. या उकाडय़ाने घामाघूम होणाऱया नागरिकांना मान्सूनच्या आगमनाची खूप उत्सुकता लागली आहे. अशातच हवामान शास्त्रज्ञांनी मान्सूनच्या ‘ऑन टाईम’ आगमनाची आनंदवार्ता दिली.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव माधवन राजीवन यांनी गुरुवारी केलेल्या ट्विटनुसार, मान्सून 1 जूनला केरळमध्ये हजेरी लावणार आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात वेळेतच सक्रीय होणार आहे. यंदा मान्सून समाधानकारक बरसणार आहे अर्थात मान्सूनचे प्रमाण सरासरीच्या 98 टक्के इतके असेल.
मान्सूनचे कोकणात आगमन झाल्यानंतर तो पुढच्या पाच ते दहा दिवसांत म्हणजेच 15 जून ते 20 जून या कालावधीत महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत हजेरी लावणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱयांची आशा पल्लवित झाली आहे.






