गावपातळीवर कोविड सेंटर उभे करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची परवानगी द्या -प्रा. प्रकाश सुरवसे.

प्रा. सुरवसे यांनी मांडलेली भूमिका सार्थ असून सरपंच ग्रामसेवकाच्या संयुक्त खात्यावर जमा असलेला निधी महामारीच्या निर्मूलनासाठी खर्च करणे सहज शक्य आहे. याबाबत गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत विषय ठेवणार असून यामुळे गावागावात कोविड सेंटर उभे राहतील.
– आनंद तानवडे जि. प. सदस्य.

अक्कलकोट (तालुका क्राईम रिपोर्टर वैदपाशा तडमुड)- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत खात्यात चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी शिल्लक आहे. तसेच चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम देखील शिल्लक आहे. हा पैसा गावपातळीवर कोविड सेंटर उभे करण्यासाठी खर्च करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केली आहे. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांच्याकडे निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली.

प्रा. सुरवसे यांनी अडचणीच्या काळात उत्तम कल्पना मांडली असून तातडीने यावर विचारविनिमय करून संबंधित गटविकास अधिकार्याना आदेश देणार आहे. व्याजाच्या रकमेतून गावातील माणसं वाचवण्याची संकल्पना अभिनव असून यातून गावे कोविडमुक्त होण्यास मदत होईल.
– दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. सोलापूर.

प्रत्येक ग्रामपंचायतीला वित्त आयोगातून विकासकामांसाठी निधी मिळतो. यापैकी अखर्चित निधी तसेच चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम, गरज भासल्यास पंधराव्या वित्त आयोगाचा निधी एकत्र करून कोरोना महामारीचा सामना करता येईल. प्रत्येक गावात मंदिर, समाजमंदिर, जि. प. शाळा, माध्यमिक शाळा, आरोग्य उपकेंद्र याठिकाणी बेड आणि आवश्यक साधने, औषधे, शक्य झाल्यास ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देता येईल. यातून प्रत्येक गावात कोविड शी संबंधित उपचार सुरु करता येतील आणि घाबरलेल्या ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल. असे मत प्रा. सुरवसे यांनी व्यक्त केले. याबाबत जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे यांनी पुढाकार घेऊन गुरुवारी होणाऱ्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा विषय ठेवावा अशी मागणी देखील करण्यात आली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here