माले – मालदीवचे माजी राष्ट्रपती आणि विद्यमान संसद अध्यक्ष मोहम्मद नशीद हे त्यांच्या घराजवळ गुरुवारी झालेल्या बॉम्ब स्फोटात जखमी झाले. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लवकरच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने (आयएस) या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम सोलिह यांनी या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी ऑस्ट्रेलियाची मदत घेणार असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियाच्या फेडरल पोलीस विभागाचे अधिकारी दाखल होणार असून तपास कार्यात मदत करणार आहेत. हा हल्ला नशीद यांच्यावर झाला नसून देशाची लोकशाही आणि अर्थव्यवस्थेवर झाला असल्याचे त्यांनी म्हटले. या हल्ल्यात नशीद किरकोळ जखमी झाले असल्याचे म्हटले जात आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. मोहम्मद नशीद यांनी काही काळापूर्वी भारत दौऱ्यादरम्यान मालदीवमध्ये इस्लामिक स्टेटच्या वाढत्या प्रभावाबाबत चिंता व्यक्त केली होती. पोलिसांनी या हल्ल्याचा तपास सुरू केला आहे.






