प्रदेश काँग्रेस अध्यक्षपद सोडण्याची अधीर रंजन चौधरी यांची तयारी

नवी दिल्ली – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या झालेल्या दारुण पराभवानंतर अधीर रंजन चौधरी यांनी प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली आहे, असे समजते. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चौधरी यांची तयारी मान्य केलेली नाही. नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत चौधरी यांनी प्रचार मोहिमेचे नेतृत्व केले होते.

निवडणुकीत झालेल्या अत्यंत मानहानिकारक पराभवाची जबाबदारी घेऊन अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चौधरी यांनी बुधवारी दूरध्वनीवर बोलताना प्रदेश अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखवली. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला यंदा प्रथमच एकही जागा जिंकता आलेली नाही. त्याला तीन टक्क्यांच्याही खाली मते मिळाली, विशेष म्हणजे यंदा डावे पक्ष आणि मुस्लीम संघटना आयएसएफशी त्याची युती होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अधीर रंजन चौधरी सध्याही पश्चिम बंगालमध्ये आहेत. ते सोनिया गांधी यांच्याशी दूरध्वनीवर बोलले व त्यांनी पद सोडण्याची तयारी दाखवली. चौधरी यांना गांधी यांनी प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी कायम ठेवा, असे सांगितल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here